सलमान खानला मारण्याचा प्लॅन!
सलमान खानला मारण्याचा प्लॅन! पनवेलच्या फार्महाऊसवर शार्प शुटरची रेकी
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन होता, अशी धक्कादायक माहिती शार्प शुटर सुक्खाने पोलिसांना दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याला पानीपत येथून अटक करण्यात आली. याप्रकरणी शार्प शुटर सुक्खाने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे. सलमान खानच्या घरासह शूटिंगच्या वेळी सेटवरही तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. पोलिसांना शार्प शुटर सुक्खाबाबत टीप मिळाली होती, यानंतर नवी मुंबई पोलिसांनी हरियाणाच्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधत पानीपतमधील हॉटेलमधून सुक्खाला अटक केली.
सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसची रेकी सुक्खाने केली होती. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या सांगण्यावरुन काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या फार्महाऊसची रेकी केल्याचं त्याने कबूल केलं आहे. सलमान खान पनवेलच्या फार्महाऊसवर येताच त्याला मारण्याचा प्लॅन होता, असंही सुक्खाने कबूल केलं आहे. सुक्खाने फार्महाऊसची रेकी करताना गार्डसोबतही मैत्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नवी मुंबई आणि मुंबई पोलिस या प्रकरणात सखोल चौकशी करत आहेत. बाबा सिद्दीकी हत्या आणि सलमान खान धमकी प्रकरणाला पोलिस कसून तपास करत आहेत. याआधी सलमानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. या प्रकरणाचाही तपास सुरु आहे. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 10 आरोपींना अटक केली आहे. याशिवाय नवी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे.