उद्धव ठाकरेची शिंदेला हरवण्याची रणनीती?

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पराभूत करण्यासाठी मोठी युद्धनीती आखत आहेत. कोपरी पाचपाखाडी या जागेसाठी ठाकरे गटाकडून एका खास चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेची शिंदेला हरवण्याची रणनीती?

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पराभूत करण्यासाठी मोठी युद्धनीती आखत आहेत. कोपरी पाचपाखाडी या जागेसाठी ठाकरे गटाकडून एका खास चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. भाजपाने आतापर्यंत 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 22 ऑक्टोबर रोजी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे.

शिंदे यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतण्याला तिकीट देण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असुन, या मतदारसंघात शिंदे यांचे मोठे प्रस्थ आहे. याच जागेवरून त्यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा पक्ष मोठी व्यूहरचना आखत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे असून ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या मतदारंसघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात केदार दिघे हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध दिघे असा सामना कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो. केदार दिघे यांनी ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखाडी या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार ठाणे शहरातून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाचा विचार शिवसेना ठाकरे गटाकडून केला जात आहे.  त्यामुळे केदार दिघे हे कोपरी पाचपाखाडी या जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. केदार दिघे यांना लवकरच याबाबत पक्षाकडून आदेश दिले जाऊ शकतात. असे झाल्यास कोपरी पाचपाखाडी या जागेसाठी दिघे विरुद्ध शिंदे असा सामना होऊ शकतो. 

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे हे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्यासह दिवंगत नेते आनंद दिघे यांचा उल्लेख आवर्जुन करतात. आनंद दिघे यांचा राजकीय वारसा एकनाथ शिंदे पुढे चालवत आहेत, असे महाराष्ट्राच्या राजकारणात म्हटले जाते. मात्र आनंद दिघे यांचे पुतणेच शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Review