सफाई कामगार महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी 'अशी' केली तयारी
सफाई कामगार महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी 'अशी' केली तयारी
आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. यासाठी ती खूप मेहनत घेत असते, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करत असते. स्वत:चे अश्रू लपवून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत असते. अशा आईचं स्वप्न पूर्ण होतं तेव्हा तिला कसं वाटत असेल? हो. ठाणे शहरातील रस्त्यावर सफाई करणाऱ्या एका महिलेच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. जेव्हा तिला कळाले की आपल्या मुलाने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. या महिलेचा 32 वर्षांचा मुलगा प्रशांत सुरेश भोजने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झाला. त्याला यूपीएससी परीक्षेत 894 वा क्रमांक मिळाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रशांतचे नेहमीच स्वप्न होते.
प्रशांत भोजनेंना मिळालेल्या यशाच्यामागे मोठ्या संघर्षाची कहामी आहे. एकदा यूपीएससी उत्तीर्ण होण्याआधी ते आधीच्या 8 परीक्षा अनुत्तीर्ण झाले होते. संघर्ष त्यांच्या पाचवीला पूजला होता. 2015 मध्ये प्रशांत यांनी पहिल्यांदा यूपीएससी दिली. यात त्यांना यश मिळाले नाही. दुसरा, तिसरा प्रयत्न केला पण यश दूरच चालले होते. सातव्या, आठव्या प्रयत्नानंतरही त्यांच्या पदरी निराशाच येत होती. घरची जबाबदारी वाढत होती. आर्थिक परिस्थिती तोंड वासून पाहत होती. अशावेळी काहीही करुन यूपीएससी तर उत्तीर्ण करायचीच हा ठाम निश्चय त्यांनी केला. नवव्यांदा परीक्षा दिली. अखेर नवव्या प्रयत्नात ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले.
त्यांच्या या कामगिरीनंतर खार्तन रोड सफाई कामगार कॉलनीतील रहिवासी आणि कुटुंबीयांनी मिळून जल्लोष केला. यानंतर लोकांनी रात्री प्रशांतची मिरवणूक काढली होती. त्यात काही स्थानिक राजकारणीही सहभागी झाले होते. प्रशांत भोजने यांची आई ठाणे महानगरपालिकेत (TMC) सफाई कामगार म्हणून काम करते. तर त्यांचे वडील नागरी संस्थेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. प्रशांत यांनी इंजिनीअरिंगची पदवी घेतली प त्या क्षेत्रात काम करण्यात त्यांना अजिबात रस नव्हता. कारण आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांना खुणावत होते.
प्रशांत सातत्याने यूपीएससी परीक्षा देत होते. 2020 मध्ये दिल्लीतील स्पर्धात्मक परीक्षा कोचिंग सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. येथे त्यांना विद्यार्थ्यांच्या मॉक परीक्षेचे पेपर तपासण्याचे काम देण्यात आले. हे काम करुन मी माझ्या अभ्यासासोबतच माझा उदरनिर्वाह चालवायचो असे प्रशांत सांगतात. परीक्षेला बसणे थांबव आणि घरी परत असे पालकांनी अनेकदा सांगितले होते. पण मला माझ्यावर विश्वास होता. माझा निश्चय दृढ होता. एकना एक दिवस मी माझे ध्येय साध्य करेल, असे मला वाटायचे असे प्रशांत यांनी सांगितले.
जेव्हा मी UPSC परीक्षेला बसत होतो, तेव्हा माझे आई-वडील काहीही न बोलता सर्वकाही सहन करत होते. पण आता माझा निकाल लागला आहे. आपला मुलगा यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे पाहून खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सुरेश भोजने यांनी दिली. माझ्या मुलाने नोकरी करावी असे मला आधी वाटायचे पण आता आम्हाला वाटते की त्याने घेतलेला निर्णय अगदी योग्य होता, असेही ते म्हणाले.