'उद्धव' गटाने अमित ठाकरेंविरोधात तक्रार केली; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र सादर
अमित ठाकरेंविरोधात 'उद्धव' गटाची तक्रार; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र
माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून अमित ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाने अमित ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांचा आरोप आहे की, छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दीपोत्सव साजरा करून अमित ठाकरे यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. ठाकरे गटाचा आरोप आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बृहन्मुंबई महानगरपालिकेने नियमबाह्य परवानगी देऊन छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दीपोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली.
ठाकरे गटाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, "महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक २०२४ ची घोषणा झाली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळावर निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून दीपोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण रोना पक्षातर्फे सर्वत्र बॅनर, गेट व कंदील लावण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्ता विरूप करण्याच्या कलमाखाली हा सरळसरळ नियमभंग आहे," असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
"तसेच या कार्यक्रमाच्या उद्घटनावेळी स्थानिक माहिम विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार अमित राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविल्याप्रमाणे ही आयोगाचे पत्र क्र ५३७/६/ओआर/१५/एनसीएस/११५८, दिनांक २९ मार्च १९९६ तसेच आयोगाचा आदेश क्र.४२७/५/इएस/००२५/१४/एमसीएस, दिनांक २१ ऑक्टोबर, १९९४ (अनुदेशांचे सारसम्म २००४मधील वाव क्र. १३३ प्रमाणे पुनरुधूत केलेले) या नियमानुसार उमेदवाराच्या निवडणूक खर्चात अंतर्भूत करणारी बाब ठरत असल्याने संपूर्ण दीपोत्सवाचा खर्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहिम विधानसभा उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा तसेच आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक जागांवर पक्षाच्या प्रचारात बेकायदेशीर परवानगी देण्याचा महापालिका अधिकारी व इतर संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी यावर भारत निवडणूक आयोगाने सख्त कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आम्ही या पत्राद्वारे करीत आहोत," असेही या पत्रात म्हटलं आहे.