भारताला अमेरिकेची चिंता नाही? जयशंकर यांचे स्पष्टीकरण
“आम्हाला अमेरिकेची चिंता नाही”, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भूमिका
मुंबईत आयोजित आदित्य बिर्ला स्कॉलरशिप कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या सत्तांतराबाबत स्पष्ट केले की, भारत कोणत्याही राजकीय बदलामुळे घाबरत नाही. ते म्हणाले, “मला याची कल्पना आहे की आज जगभरातले देश अमेरिकेबाबत काळजीत आहेत. आपण हे मान्य करायलाच हवं. पण आपण त्यापैकी एक नाही आहोत”. जयशंकर यांनी यावेळी सांगितले की, निकालांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी उचललेल्या पहिल्या तीन फोन कॉल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश होता. त्यामुळे भारताच्या दृष्टीने अमेरिकेच्या राजकीय बदलाची चिंता नाही.
जयशंकर यांनी यावेळी भारत-अमेरिका संबंधांवर होणाऱ्या परिणामांबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी नकारात्मक परिणामांची शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले, “खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी येणाऱ्या अनेक प्रमुखांशी चांगले संबंध ठेवले आहेत. अतिशय स्वाभाविक पद्धतीने ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी असणारे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करतात”.
जयशंकर यांनी यावेळी भारताच्या धोरणाचे कौतुक करत सांगितले की, जगभरातल्या देशांचं लक्ष सध्या भारताकडे असून आर्थिक धोरणांवर केंद्रीत केलेलं लक्ष यासाठी कारणीभूत आहे. “आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण एकमेकांना फक्त लष्करी किंवा राजकीय सामर्थ्याच्या आधारावर जोखत नसून तंत्रज्ञान, आर्थिक क्षमता, मनुष्यबळ आणि सामाजिक सुधारणा हे मुद्देही महत्त्वाचे मानले जातात. कोणताही देश एकाच क्षेत्रातील सामर्थ्याच्या जोरावर विकसित होऊ शकत नाही”, अशा शब्दांत त्यांनी यावेळी भूमिका मांडली.